दि ग्रेट मराठा
this site the web

Recent Photos

image
image
image

सुनील गावसकर




सुनील गावस्कर यांना डॉक्टरेट

सुनील मनोहर गावसकर यांना आपण ओळखतो ते भारताचा महान क्रिकेटर म्हणून. ओपनिंग बॅट्समन या नात्यानं त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात स्वत:चा एक वेगळा आदर्श निर्माण केलाच, पण एक क्रिकेटर म्हणून रिटायर झाल्यावरही त्यांनी विविध भूमिकांमधून खेळाशी आपलं नातं जपलं. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीनं गावसकर यांच्या क्रिकेट कर्तृत्त्वाचा बुधवारी खास गौरव करण्यात येणार आहे. तो त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून.
 सुनील मनोहर गावसकर... भारतीय क्रिकेटची ओरिजिनल वॉल. साठ वर्षांच्या आयुष्यात गावसकर यांच्या वाट्याला आजवर अनेक मानसन्मान आले. बुधवारी आणखी एका सन्मानाचं भाग्य त्यांना लाभणारय. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीनं गावसकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्याचा निर्णय घेतलाय. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या कोन्व्होकेशन सोहळ्यात गावसकर यांना ही डॉक्टरेट देण्यात येईल.
 सचिन तेंडुलकर या नावानं जगभरातल्या क्रिकेटरसिकांवर गारूड करण्याच्याही दीड दशकआधी भारताला क्रिकेटच्या नकाशावर मानाचं पान मिळवून देणारं नाव होतं सुनील गावसकर.
ऑल टाइम ग्रेटेस्ट ओपनिंग बॅट्समन म्हणजे सुनील गावसकर,फलंदाजीतल्या तंत्रशुद्धतेचा अंतिम शब्द म्हणजे सुनील गावसकर, निश्चयाचा... एकाग्रतेचा महामेरू म्हणजे सुनील गावसकर, महाराष्ट्रभूषण म्हणजे सुनील गावसकर आणि भारताची शान म्हणजेही सुनील गावसकर, सुनील गावसकर या नावाचं महात्म्य क्रिकेट इतिहासाच्या पानापानावर आढळतं.
 कसोटी सामन्यांच्या रणांगणात दहा हजार रन्सचा पल्ला ओलांडणारा पहिला बॅट्समन. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा बॅट्समन. अशा एक ना अनेक पराक्रमांनी सुनील गावसकर हे नाव क्रिकेटच्या दुनियेत अजरामर करून ठेवलं आहे.

सुनील गावसकर यांचं कर्तृत्त्व इतकं मोठं आहे की, त्या नावाची महानता रेकॉर्डबुक्सच्या बाऊंड्रीलाइनमध्ये मावणारी नाही, क्रिकेटच्या दुनियेत भारतीयांना ताठ मानेनं जगण्याचा आत्मविश्वास दिला तो सुनील गावसकर यांनी, भारतीय क्रिकेटला प्रोफेशनॅलिझमचा अर्थ समजावून दिला तोही सुनील गावसकर यांनीच.
 गावसकर यांनी १९८७ साली आपली बॅट म्यान करून लेखणी परजली. टेलिव्हिजनच्या युगात कॉमेण्ट्री बॉक्समधला माइकही त्यांचं अस्त्र बनला. बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये प्रशासकीय भूमिका बजावत असूनही गावसकर यांनी आपल्या लेखणीशी आणि कॉमेण्ट्रेटरच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. त्यातूनच गावसकर यांच्यावर आयसीसीच्या क्रिकेट कमिटीचा राजीनामा देण्याची वेळ आली. आणि विशेष म्हणजे सुनील गावसकर त्या प्रसंगातही झुकले नाहीत. वयाच्या साठीतल्या या स्वाभिमानाचाच मानद डॉक्टरेटनं गौरव होत आहे.

तानाजी मालुसरे

 

सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

शत्रूवर आक्रमण करताना
बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली. 


तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,
......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .
ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे. 

बाजीप्रभू देशपांडे


 स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे ‘शूर सरदार’!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील - मावळातील- सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणार्‍या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.

महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभाव होता आणि वडीलकीच्या नात्याने काळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे - या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण पणाला लावले. ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही) आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला.  त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील (पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते. (ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.)

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’

(प्रख्यात दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांनी ‘बाजीप्रभू देशपांडे’ ह्या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजी प्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.)

राजमाता जिजाबाई


                                                                                                                                                           आपल्या मनात तया
र असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता!

कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही.
हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या  भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.
    राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
   ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणार्‍या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.
   लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी.... सगळंच विपीरीत घडत होतं.
    शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकर्‍यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.
    जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला (१६०५). दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं. ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, म्हणून पदर पसरला. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणार्‍या किती माता या समाजात असतील देव जाणे, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणार्‍या दैत्यांचा नि:पात झाला.
   
भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं, कारण जे दु:ख जिजाऊचं होतं तेच दु:ख भवानी मातेचं होतं. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरं पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या गरजा एक होत्या. लक्ष्य एक होते. स्वप्न एक होते. या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.
    जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
    ‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.
  
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
    मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही  भूमिका पार पाडल्या.
या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

शहाजीराजे भोसले


 पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व! 

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.
 फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा १६०३ साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
 दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर १६३९ साली
आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच
उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
 दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
 शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ. स. १६२५ ते १६२८    -    आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९    -    निजामशाही
इ. स. १६३० ते १६३३    -    मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६     -    निजामशाही
इ.स. १६३६ पासून पुढे   -    आदिलशाही

पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.  काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

झाशीची राणी लक्ष्मीबाई


इ. स. 1857 मध्ये भारतातील काही असंतुष्ट संस्थानिक आणि इंग्रज सेनेतील असंतुष्ट सैनिकांनी कंपनी सरकारविरूद्ध बंडाचं निशाण फडकावलं. "शिपायांचं बंड' म्हणून ते ओळखलं जातं. त्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने मोठा पराक्रम गाजवला आणि अखेरीस ती शूर स्त्री धारातिर्थी पडली. इंग्रजांनी तिचं संस्थान खालसा केलं, त्यावेळी ती बाणेदारपणे उद्‌गारली होती - ""मेरी झॉंसी नहीं दूँगी!''
1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं.
पहिल्या बाजीराव पेशव्याने छत्रसालास जी मदत केली, त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावास बुंदेलखंड मिळाला. त्यातील त्यावेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागिरी म्हणजे झाशी. 1835 मध्ये या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने दरवेळी इंग्रजांना जी मदत केली तिचा मोबदला म्हणून "महाराजाधिराज फिदवी बादशहा - जमाइंग्लिश्‍तान' ही पदवी मिळाली व झाशी एक संस्थान बनले.
लक्ष्मीबाईचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहेरबानीने संस्थानाधिपती झाला होता. 1843 साली त्याला राजेपदाचे हक्क मिळाले. लक्ष्मीबाई ही त्याची दुसरी पत्नी. विवाहसमयी तिचं वय 11-12 वर्षांचं होतं आणि मृत्युसमयी (1858) तिचं वय फार तर 23-24 वर्षांचं होतं.
गंगाधरराव 1853 साली वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पूत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपलं संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिलं, आपापसात किती प्रेमाचे संबंध राहात आले, यावर बोट ठेवणं हा होता. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि 1854 साली इंग्रजांनी तिला 60 हजाराचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा केलं. त्यावेळी तिने ते तिचे ते "मेरी झॉंसी नहीं दूँगी!' हे प्रसिद्ध उद्‌गार काढले असं सांगण्यात येत असलं, तरी त्यावेळी मात्र तिने मुकाट्याने किल्ला खाली करून गावात राहणं पत्करलं. पुढं 57 सालापर्यंत गडबड न करता, अर्ज-विनंत्या-तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारलं. नंतर नाईलाजाने स्वीकारलं.
6 जून 1857 रोजी झाशीचा उठाव झाला आणि लक्ष्मीबाईने झाशीचा कारभार ताब्यात घेतला. पण नंतर तिने या घटनेसंबंधी इंग्रजांना स्पष्टिकरण दिलं आणि मग कमिशनरच्या हुकुमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी 1858 पर्यंत तिने इंग्रजांच्यासंबंधीचं मित्रत्त्वाचं धोरण बदललं नव्हतं असं मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजांनी झाशीकडे कूच केलं. त्यावेळीही लक्ष्मीबाईने आपलं म्हणणं इंग्रजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्यावेळी तिच्यासमोर निश्‍चित स्वरुपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की झाशी संस्थान परत मिळणार नाही. इंग्रजांचा आपल्यावर विश्‍वास नाही. त्यांना शरण जाऊन मानहानीकारक जिणं जगावं किंवा फासावर चढावं हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावं हा दुसरा मार्ग, त्यावेळी तिने दुसरा मार्ग स्वीकारला आणि इथून पुढं तिने अतिशय शौर्याने लढा दिला.

तात्या टोपे

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे घराणे मुळचे येवल्याचे. तात्यांचे वडील बाजीराव पेशवे यांच्या धर्मदाय विभागाचे प्रमुख होते. पांडुरंगरावांची विद्वत्ता आणि कर्तव्यदक्षता या गुणांवर मोहीत होऊन बाजीरावांनी भर राजसभेत अतीमौल्यवान नवरत्‍नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला, तेव्हापासून त्यांचे आडनाव टोपे झाले !
पेशवाईच्या समाप्‍तीनंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तेथे तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत स्थान पटकावले. सत्तावन्नचा क्रांतीकाल जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे प्रमुख सल्लागारही बनले. सत्तावन्नच्या क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी; पण सर्वांत परिणामकारक झुंज दिली ती तात्यांनीच !
झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाइंर्नी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला. तात्यांनाही तो पटला. ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतीपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन होते. त्यांनी क्रांतीकारकांबरोबरच युद्ध सुरू केले; पण तात्यांना समोर पहाताच शिंद्यांचे सारे सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी मग रावसाहेब पेशव्यांच्या अधिपत्याखाली ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्यच प्रस्थापित केले. ३ जून १८५८ ला रावसाहेब पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्‍नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापतीपदाचा मान दिला !

युरोपातील वर्तमानपत्रांनीही दखल घेतली !
१८ जून रोजी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेरही इंग्रजांच्या ताब्यात गेले. यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना नामोहरम करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्‍नी व मुले यांना अटकेत टाकले. तात्यांना पकडण्यासाठी सहा इंग्रज सेनानी तीन दिशांनी प्रयत्‍न करत होते; पण तात्या त्यांच्या जाळयात येत नव्हते. यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन व पाठलागावर असणार्‍या इंग्रज सैन्याची दाणादाण उडवून २६ ऑक्टोबर १८५८ रोजी तात्या नर्मदा ओलांडून दक्षिणेत उतरले. या घटनेला इंग्लंडमधीलच नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले. ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती !
संख्येने सहस्रावधी असलेल्या इंग्रज सैन्यावर हा वीर मूठभर सैन्यानिशीच हल्ला चढवायचा. चढाई करण्यात अत्यंत अवघड असलेला आणि तुटपुंजे सैन्यबळ असतांना तात्यांनी काल्पीचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. इतकेच नव्हे, तर तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या जनरल विंडहॅम या सेनापतीचा व त्याच्या सैन्याचा धुव्वा उडवला.

इंग्रजांनी फितुरीचा आश्रय घेतला !
सतत दहा महिने एकट्याने इंग्रजांच्या नाकीनव आणणार्‍या तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या मानसिंगच्या करवी ७ एप्रिल १८५९ रोजी तात्यांना परोणच्या अरण्यात झोपेत असतांना पकडण्यात आले. १५ एप्रिल रोजी तात्यांचा अभियोग सैनिकी न्यायालयासमोर शिप्री येथे चालू करून त्याच दिवशी घाईने पुरा करण्यात आला. या न्यायालयाचा निकाल ठरलेला होता.
१८ एप्रिल १८५९ रोजी सायंकाळी ग्वाल्हेरजवळील शिप्रीच्या किल्ल्याजवळील पटांगणात तात्यांना जाहीर फाशी देण्यात आले.
सामान्यातून असामान्य बनून १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम ज्याने अनेक महिने धगधगत ठेवला, त्या तात्या टोपे यांच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही !
 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies