दि ग्रेट मराठा
this site the web

तानाजी मालुसरे

 

सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

शत्रूवर आक्रमण करताना
बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली. 


तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,
......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .
ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे. 

बाजीप्रभू देशपांडे


 स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे ‘शूर सरदार’!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील - मावळातील- सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणार्‍या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.

महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभाव होता आणि वडीलकीच्या नात्याने काळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे - या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण पणाला लावले. ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही) आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला.  त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील (पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते. (ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.)

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’

(प्रख्यात दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांनी ‘बाजीप्रभू देशपांडे’ ह्या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजी प्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.)

राजमाता जिजाबाई


                                                                                                                                                           आपल्या मनात तया
र असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता!

कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही.
हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या  भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.
    राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
   ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणार्‍या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.
   लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी.... सगळंच विपीरीत घडत होतं.
    शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकर्‍यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.
    जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला (१६०५). दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं. ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, म्हणून पदर पसरला. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणार्‍या किती माता या समाजात असतील देव जाणे, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणार्‍या दैत्यांचा नि:पात झाला.
   
भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं, कारण जे दु:ख जिजाऊचं होतं तेच दु:ख भवानी मातेचं होतं. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरं पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या गरजा एक होत्या. लक्ष्य एक होते. स्वप्न एक होते. या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.
    जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
    ‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.
  
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
    मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही  भूमिका पार पाडल्या.
या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

शहाजीराजे भोसले


 पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व! 

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.
 फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा १६०३ साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
 दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर १६३९ साली
आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच
उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
 दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
 शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ. स. १६२५ ते १६२८    -    आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९    -    निजामशाही
इ. स. १६३० ते १६३३    -    मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६     -    निजामशाही
इ.स. १६३६ पासून पुढे   -    आदिलशाही

पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.  काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

झाशीची राणी लक्ष्मीबाई


इ. स. 1857 मध्ये भारतातील काही असंतुष्ट संस्थानिक आणि इंग्रज सेनेतील असंतुष्ट सैनिकांनी कंपनी सरकारविरूद्ध बंडाचं निशाण फडकावलं. "शिपायांचं बंड' म्हणून ते ओळखलं जातं. त्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने मोठा पराक्रम गाजवला आणि अखेरीस ती शूर स्त्री धारातिर्थी पडली. इंग्रजांनी तिचं संस्थान खालसा केलं, त्यावेळी ती बाणेदारपणे उद्‌गारली होती - ""मेरी झॉंसी नहीं दूँगी!''
1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं.
पहिल्या बाजीराव पेशव्याने छत्रसालास जी मदत केली, त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावास बुंदेलखंड मिळाला. त्यातील त्यावेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागिरी म्हणजे झाशी. 1835 मध्ये या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने दरवेळी इंग्रजांना जी मदत केली तिचा मोबदला म्हणून "महाराजाधिराज फिदवी बादशहा - जमाइंग्लिश्‍तान' ही पदवी मिळाली व झाशी एक संस्थान बनले.
लक्ष्मीबाईचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहेरबानीने संस्थानाधिपती झाला होता. 1843 साली त्याला राजेपदाचे हक्क मिळाले. लक्ष्मीबाई ही त्याची दुसरी पत्नी. विवाहसमयी तिचं वय 11-12 वर्षांचं होतं आणि मृत्युसमयी (1858) तिचं वय फार तर 23-24 वर्षांचं होतं.
गंगाधरराव 1853 साली वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पूत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपलं संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिलं, आपापसात किती प्रेमाचे संबंध राहात आले, यावर बोट ठेवणं हा होता. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि 1854 साली इंग्रजांनी तिला 60 हजाराचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा केलं. त्यावेळी तिने ते तिचे ते "मेरी झॉंसी नहीं दूँगी!' हे प्रसिद्ध उद्‌गार काढले असं सांगण्यात येत असलं, तरी त्यावेळी मात्र तिने मुकाट्याने किल्ला खाली करून गावात राहणं पत्करलं. पुढं 57 सालापर्यंत गडबड न करता, अर्ज-विनंत्या-तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारलं. नंतर नाईलाजाने स्वीकारलं.
6 जून 1857 रोजी झाशीचा उठाव झाला आणि लक्ष्मीबाईने झाशीचा कारभार ताब्यात घेतला. पण नंतर तिने या घटनेसंबंधी इंग्रजांना स्पष्टिकरण दिलं आणि मग कमिशनरच्या हुकुमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी 1858 पर्यंत तिने इंग्रजांच्यासंबंधीचं मित्रत्त्वाचं धोरण बदललं नव्हतं असं मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजांनी झाशीकडे कूच केलं. त्यावेळीही लक्ष्मीबाईने आपलं म्हणणं इंग्रजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्यावेळी तिच्यासमोर निश्‍चित स्वरुपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की झाशी संस्थान परत मिळणार नाही. इंग्रजांचा आपल्यावर विश्‍वास नाही. त्यांना शरण जाऊन मानहानीकारक जिणं जगावं किंवा फासावर चढावं हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावं हा दुसरा मार्ग, त्यावेळी तिने दुसरा मार्ग स्वीकारला आणि इथून पुढं तिने अतिशय शौर्याने लढा दिला.

तात्या टोपे

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे घराणे मुळचे येवल्याचे. तात्यांचे वडील बाजीराव पेशवे यांच्या धर्मदाय विभागाचे प्रमुख होते. पांडुरंगरावांची विद्वत्ता आणि कर्तव्यदक्षता या गुणांवर मोहीत होऊन बाजीरावांनी भर राजसभेत अतीमौल्यवान नवरत्‍नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला, तेव्हापासून त्यांचे आडनाव टोपे झाले !
पेशवाईच्या समाप्‍तीनंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तेथे तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत स्थान पटकावले. सत्तावन्नचा क्रांतीकाल जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे प्रमुख सल्लागारही बनले. सत्तावन्नच्या क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी; पण सर्वांत परिणामकारक झुंज दिली ती तात्यांनीच !
झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाइंर्नी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला. तात्यांनाही तो पटला. ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतीपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन होते. त्यांनी क्रांतीकारकांबरोबरच युद्ध सुरू केले; पण तात्यांना समोर पहाताच शिंद्यांचे सारे सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी मग रावसाहेब पेशव्यांच्या अधिपत्याखाली ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्यच प्रस्थापित केले. ३ जून १८५८ ला रावसाहेब पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्‍नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापतीपदाचा मान दिला !

युरोपातील वर्तमानपत्रांनीही दखल घेतली !
१८ जून रोजी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेरही इंग्रजांच्या ताब्यात गेले. यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना नामोहरम करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्‍नी व मुले यांना अटकेत टाकले. तात्यांना पकडण्यासाठी सहा इंग्रज सेनानी तीन दिशांनी प्रयत्‍न करत होते; पण तात्या त्यांच्या जाळयात येत नव्हते. यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन व पाठलागावर असणार्‍या इंग्रज सैन्याची दाणादाण उडवून २६ ऑक्टोबर १८५८ रोजी तात्या नर्मदा ओलांडून दक्षिणेत उतरले. या घटनेला इंग्लंडमधीलच नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले. ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती !
संख्येने सहस्रावधी असलेल्या इंग्रज सैन्यावर हा वीर मूठभर सैन्यानिशीच हल्ला चढवायचा. चढाई करण्यात अत्यंत अवघड असलेला आणि तुटपुंजे सैन्यबळ असतांना तात्यांनी काल्पीचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. इतकेच नव्हे, तर तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या जनरल विंडहॅम या सेनापतीचा व त्याच्या सैन्याचा धुव्वा उडवला.

इंग्रजांनी फितुरीचा आश्रय घेतला !
सतत दहा महिने एकट्याने इंग्रजांच्या नाकीनव आणणार्‍या तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या मानसिंगच्या करवी ७ एप्रिल १८५९ रोजी तात्यांना परोणच्या अरण्यात झोपेत असतांना पकडण्यात आले. १५ एप्रिल रोजी तात्यांचा अभियोग सैनिकी न्यायालयासमोर शिप्री येथे चालू करून त्याच दिवशी घाईने पुरा करण्यात आला. या न्यायालयाचा निकाल ठरलेला होता.
१८ एप्रिल १८५९ रोजी सायंकाळी ग्वाल्हेरजवळील शिप्रीच्या किल्ल्याजवळील पटांगणात तात्यांना जाहीर फाशी देण्यात आले.
सामान्यातून असामान्य बनून १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम ज्याने अनेक महिने धगधगत ठेवला, त्या तात्या टोपे यांच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही !

विनोबा भावे


विचार, उच्चार व आचार या सर्वच बाबतीतील महात्मा गांधीजींचे सच्चे अनुयायी आणि ‘जय जगत’चा घोष करणारे भारतातील थोर आध्यात्मिक नेते !
भारतीय समाजाला एक नवी दिशा व प्रेरणा देणार्‍यांमध्ये विनोबा भावे हे एक महत्त्वाचे नाव आहे. विनोबाजींचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते आणि आपले आयुष्य देशसेवेसाठीही वाहून घ्यायचे होते. हर तर्‍हेच्या बंधनातून मुक्त होऊन समाजाची सेवा करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गाकडे मन आकर्षित होऊ नये यासाठी त्यांनी आपली सगळी शैक्षणिक प्रमाणपत्रे चुलीत जाळून टाकली. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले खरे परंतु वाटेत सुरत स्टेशनवर ते उतरले व तेथून भुसावळमार्गे काशीला गेले. काशीला त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.
त्यानंतर ते गांधीजींना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले. गांधीजी त्यांचा साधेपणा, संयम आणि सेवाभाव पाहून प्रभावित झाले. त्यांनी विनोबाजींना अहमदाबादमधल्या आश्रमातच राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादेतील आश्रमातून ते एका वर्षाची सुट्टी घेऊन वाईला गेले. तेथे त्यांनी प्राज्ञ पाठशाळेत राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला.
१९२१ साली ते आपल्या काही सहकार्‍यांसोबत वर्ध्याला जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी सेठ जमनालाल बजाज यांच्या साहाय्याने सत्याग्रह-आश्रमाची स्थापना केली.  जमनालाल बजाजांनी विनोबाजींना आपले गुरू मानले होते. या आश्रमात प्रवेश करण्यासाठी लिंग, जात, धर्माचे कोणतेच बंधन नव्हते. विनोबाजींनी वर्ध्याजवळील पवनार येथे ‘परमधाम’ आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात असत.
केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांच्या वस्तीतून जायचा. हा मार्ग ब्राह्मणांनी अस्पृश्यांसाठी शेकडो वर्षे बंद ठेवला होता. याविरुद्धच्या १९२४ मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले.
   स्वातंत्र्यलढ्यात १९३२ साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन द्यायला सुरुवात केली. जेलमध्येच ही प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे ती ‘गीता प्रवचने’ म्हणून प्रकाशित करण्यात आली. ‘गीताई’ या ग्रंथाद्वारे विनोबाजींनी गीतेचा मराठी अनुवाद केला. (सर्वसाधारण वाचकासह आध्यात्मिक साधक व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनाच ‘गीताई’ आजही मार्गदर्शक ठरते आहे.) त्यांना गुजराती, बंगाली, उडिया, तेलुगू, कन्नड, मल्याळम्‌, उर्दू, अरबी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवनदृष्टी, अभंगव्रते, स्वराज्यशास्त्र असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
१७ ऑक्टोबर, १९४० पासून म. गांधींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. यातील पहिले सत्याग्रही म्हणून गांधींजींनी विनोबा भावे यांची निवड केली होती. विनोबाजी कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाची सर्व पूर्वतयारी विनोबाजींच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
 स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना केली. १९५१ साली त्यांची  अभूतपूर्व अशी ‘भूदान’ चळवळ सुरू झाली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ग्रामदान, ग्रामराज्य, संपत्तीदान या संकल्पनांचाही त्यांनी चळवळीत अंतर्भाव केला. या अनोख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शांततापूर्ण मार्गाने असंतुलित जमीन मालकीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना बहाल केली. ‘सब भूमि गोपाल की’ हा या चळवळीचा नारा होता.  दरम्यान आपल्या आध्यात्मिक, मानवतावादी विचारांच्या साहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांचे मतपरिवर्तनही केले. राजकीय कार्य, भूदान चळवळ या गोष्टी एकीकडे करत असतानाच समांतरपणे, सातत्याने चालू असलेली प्रखर आध्यात्मिक साधना हे त्यांच्या जीवनाचे मुख्य वैशिष्ट्य होय.
आचार्य विनोबाजींनी ऋग्वेदास, वेदान्तसुधा, गुरूबोधसार, भागवतधर्म प्रसार इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विचार मांडले. तसेच त्यांनी ‘मधुकर’, ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकांतूनही  लेखन केले. धर्म, अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा इत्यादी विषयांवरील लेखन त्यांनी नियतकालिकांतून केले. त्यांचे लेखन आणि आध्यात्मिक व राजकीय कार्य यांमुळे त्यांना जयप्रकाश नारायण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे अनुयायी लाभले.
अशा या प्रतिभावंत, निश्चयी महात्म्याचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले. १९८३ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक



लोकमान्य टिळक म्हंटले कि, पहिले आठवते ते त्यांचे वाक्य. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच."
टिळकांचा जन्म रत्नागिरी मधील "मधल्या आळीत" एका मध्यमवर्गीय "मराठी चित्पावन ब्राम्हण" कुटुंबात झाला. पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये १८७७ साली त्यांचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण झाला. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायल सुरुवात केली. व नंतर त्यानी वृत्त्पत्रकरित चालु केली.
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हि दोन वृत्तपत्रे चालु केली. त्यात त्यांना गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर आणि इतर सहकार्यांची मदत मिळाली.
वृत्तपत्रात सरकारविरोधी जहाल लिखाणामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्य विरुद्ध गुन्ह दाखल केला व मंडाले (बर्मा) तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा दिली.
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी "सार्वजनिक गणेशोत्सव" व "सार्वजनिक शिवजयंती" हे उत्सव सुरु केले.
टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते[१] [२]. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते[३]. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. [४]

त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.[५] पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला. [६]
टिळकांनी आगरकर, चिपणूनकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. केसरीचा मुख्य उद्देश अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्‍या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परिक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये तात्काळ प्रसिद्ध झाले. १८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

गुढीपाडवा


चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो.
ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :
१. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.
दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.
२. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.
गुढीपाडवा असा साजरा करावा!
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

नागपंचमी


नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.
या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता.त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी).
तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वहातात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात.पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात.नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात.नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१)अनंत २) वासुकी ३) शेष ४)पद्मनाभ ५) तक्षक ६)कालीया ७)शंखापाल ८)कंषल ९)धृतराष्ट्र
नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिद्ध मानले आहे. कारण वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोचण्याची शक्यता असते असे मानले जाते.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात.
या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर-खोब-याची दिंडे बनवतात.

महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुद्धा तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रद्धा आहे.
नारळी पौर्णिमा ( श्रावण शुद्ध पौर्णिमा)
समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते.जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.
राखी पौर्णिमा (श्रावण शुद्ध पौर्णिमा)
हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या खोब-याच्या वडया , नारळाची बर्फी , नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.
गोकुळ अष्टमी ( श्रावण वद्य अष्टमी)
राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला, आणि भगवदगीता यांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.
या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले.ही कथा सर्वज्ञात आहेच.पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युद्धात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्व जण ह्या दिवशी उपवास करतात.रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात.त्यांस तोडे, साखळ्या असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.
दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही , साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वत:ला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिद्धीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.

गोकुळ अष्टमी


राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला, आणि भगवदगीता यांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.
या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले.ही कथा सर्वज्ञात आहेच.पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युद्धात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्व जण ह्या दिवशी उपवास करतात.रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात.त्यांस तोडे, साखळ्या असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.
दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही , साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वत:ला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिद्धीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.

संत गोरोबा कुंभार


गोरा कुंभार हे आध्यत्मिकदृष्ट्या संतपदाला पोहोचलेले होते, तसेच ते संत कवीही होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते अनन्यसाधारण भक्त होते. गोराबा हे संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यांना सर्व जण गोरोबाकाका म्हणत असत. त्यांचे गाव मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबादजवळील तेर-ढोकी (या गावास सत्यपुरी किंवा  तेरणा असेही म्हणतात) हे होय. गोरोबाकाका प्रापंचिक असूनही विरक्तच राहिले. त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता, पारमार्थिक क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला गेला. संत ज्ञानेश्र्वर-नामदेव यांच्या समकालीन असलेल्या गोरोबांचे जन्मवर्ष इ. स. १२६७ मानले जाते.

श्री विठ्ठलाचे स्मरण सतत त्यांच्या मुखात असे. त्यांना नामस्मरणापुढे कशाचेच भान उरत नसे. त्यांच्या भक्तिरसात बुडून जाण्याबाबतची पुढील कथा सांगितली जाते.

एकदा त्यांची पत्नी पाणी आणावयास म्हणून बाहेर गेली होती. तिने त्यांना आपल्या तान्ह्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. गोरोबाकाका उन्मनी अवस्थेत गाडगी, मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडवून चिखल करीत होते. त्यांचे ते तान्हे लेकरू चिखल करताना पायाखाली तुडविले गेले, तरी त्यांना भान नव्हते. पत्नी पाणी घेऊन आल्यावर पाहते, तर तिचे मूल गतप्राण झालेले होते. तिने हंबरडा फोडल्यावर गोरोबाकाका शुद्धीवर आले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोरोबांना वाटले आपण काय करून बसलो. अतिशय मनस्वी पश्र्चातापात ते दग्ध झाले. पण काही काळानंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले आणि त्यांच्या पत्नीस परत मिळाले. यानंतर त्यांची पत्नीही विठ्ठलभक्त झाली.

(या घटनेवर आपला विश्र्वास बसत नाही. पण गोरोबाकाकांचे कोणतेही लिखित चरित्र उपलब्ध नाही. २-३ प्रसंग मौखिक परंपरेतून चालत आले आहेत. या प्रसंगांवरून त्यांच्या अमर्याद भक्तीची  व त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची कल्पना आपल्याला येते एवढे निश्र्चित.)

संत गोरोबांकडे तेर-ढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी ‘कोणाचे मडके (डोके) किती पक्के’ अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली होती, असाही प्रसंग सांगितला जातो.

संत गोरोबांची उपलब्ध काव्यरचना अत्यल्प आहे. त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत. त्यांची काही पदरचना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथील बाडात सापडते. गोरोबा हे साक्षात्कारी संत होते.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे। तव झालो प्रसंगी गुणातीत।।
अशा त्यांच्या अभंगांत अद्वैत साक्षात्काराचीच अनुभूती केवळ प्रकट झालेली दिसते. ‘म्हणे गोरा कुंभार’ ही त्यांची नाममुद्रा होय.


संत ज्ञानेश्र्वरांनी प्रतिपादिलेला ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग संत गोरोबांनी स्वीकारलेला दिसतो. प्रपंच करत परमार्थ साधता येतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबाकाका! त्यांची समाधी तेर गावी आहे. हे गाव सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असून लातूरपासूनही जवळ आहे.

होळी,

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे.

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.

दिपावली


दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्‍विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्‍विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: ते सण वेगवेगळे आहेत.
दिवाळी पुराण आणि इतिहासातील दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:- diwali ND ND 1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. 2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. 3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. 4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले. 5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. 6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. 7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते. 8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती. 9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता. 10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे. 11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. 12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. ‘महावीर सवंत्’ त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे. 13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. 14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. 16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. 17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत

गणेशोत्सव


समर्थ रामदास



श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (ता. अंबड, जि. औरंगाबाद) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. जांब ही समर्थांची जन्मभूमि, पंचवटी क्षेत्र ही त्यांची तपोभूमि आणि अखिल भारत ही कर्मभूमि होती. गीतेत वर्णिलेला स्थितप्रज्ञ व निष्काम कर्मयोगी यांची चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामी. सन २००८ च्या रामनवमीस त्यांची ४०० वी जयंती होती. या निमित्ताने या महा-पुरूषाचे आणि त्याच्या कार्याचे विनम्र-भावे स्मरण करावे, एवढाच या छोट्याशा लेखाचा उद्देश आहे.
भरतांत संत पुष्कळ होउन गले. पण राष्ट्र-गुरू हे बिरूद ज्यांना शोभेल असे संत दुर्मिळच आहेत. श्रीमद आद्य शंकराचार्य हे एक राष्ट्र-गुरू होते. अलीकडील काळांत विवेकानंद हे राष्ट्र-गुरू होउन गेले. राष्ट्र-गुरू हा समाजांतील कोणत्या तरी एकद्या छोट्याशा गटाच्या नव्हे, तर सा-या राष्ट्राच्या उध्दारासाठी झटत असतो. त्याचप्रमाणे राष्ट्राचा केवळ पारमार्थिक उध्दारच नव्हे, तर ऐहिक उध्दारही साधण्याची त्याची महत्वाकांक्षा असते. समर्थ रामदास हेही एक महान राष्ट्र-गुरू होउन गेले. छ्त्रपति शिवाजीमहाराजांसारख्या पुण्यश्लोक पुरूषाने त्यांना गुरु मानले होते. हे पाहिले म्हणजे त्यांच्या योग्यतेविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता उरत नाही.
समर्थांच नाव नारायण. सूर्याजिपंत ठोसर हे त्यांचे वडील, आणि राणूबाई या त्यांच्या मातोश्री. नारायण सात वर्षाचा असतांनाच सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण हा मुलगा लहानपणापासूनक विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुध्दिमान आणि निश्चयी होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने याचे लग्न ठरविण्यात आले. त्यावेळी याचे वय होते १२ वर्षाचे. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. पाण्यांत किडे, मासे, इत्यादि चावत असत. १२ वर्षाच्या तीव्र तपसश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्र केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.
आत्म साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.
रोग्यास एकाएकी शक्तिवर्धक आहार दिल्यास तो न पचल्यामुळे फायद्याऐवजी त्याचे नुकसानच होण्याचा संभव असतो. म्हणून शक्तिवर्धक आहार देण्यापुर्वी कुशल वैध रोग्यास प्रथम बनवितो. परमार्थ हाही दुर्बलाचा प्रांत नव्हे. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
त्या काळी समाज-स्थिति कशी होती. हे या कथेवरून चंगले दिसून येते. ही कथा एकनाथांच्या सहनशीलतेची आहे खरी, पण त्याहीपेक्षा अधिक ती समाजाच्या नामर्दपणाची कथा आहे. एका संताच्या अंगावर अनेकदां थुंकणा-या त्या मुजोर अविंधाला जाब विचारणारा समाजांत कोणी निघाला नाही! अन्यायाचा प्रतिकार केला पाहीजे, हे कोणीच सांगत नव्ह्ते. सारे नाथांच्या सहनशीलतेचे गुणगान करून स्वत:ची नामर्दता झांकीत होते.
स्वदेशाच्या शोचनीय स्थितीने अंत:करण तिळतिळ तुटणारे आणि समाजाची स्थिती सुधारण्याची तळमळ असणारे संत तेव्हां नव्हते, असे नाही. पण नुसत्या तळमळीने काय होते? प्रत्यक्ष कृतीशिवाय नुसती तळमळ व्यर्थच नव्हे काय? प्रत्यक्ष कृति केवळ समर्थांनी केली आहे. इतर संत प्रपंच सोडून केवळ निवृति सांगत होते. तर समर्थांनी निवृति व प्रवृति यांचा समन्वय सांगितला. समर्थांनी परमार्थ सोडला नाही. पण त्यासाठी प्रत्यक्ष व्यवहाराकडे त्यांनी डोळेझांक केली नाही. स्वत:चा एकट्याचा प्रपंच सोडून त्यांनी सारया समाजाचा प्रपंच सांभाळ्ला. समर्थ संत होते, पण व्यवहारीही होते. संन्यासी होते, पण राजकारणीही होते. आणि भक्तिमार्गीही होते. पण केवळ टाळ्कुटे नव्ह्ते! समर्थांचे वेगळेपण यावरून दिसून येते.
"यतोSभुदय-नि:श्रेयस-सिध्दि: स धर्म:" या व्याख्येस अनुसरून एहिक अभ्युदय आणि पारमार्थिक नि:श्रेयस हे दोन्ही साधणे हे धर्माचे स्वरूप त्यांनी प्रतिपादिले. हाच "महाराष्ट्र-धर्म" होय. शारीरिक शक्तिसाठी मारूति व नैतिक शक्तिसाठी राम यांच्या उपासनेची त्यांनी योजना केली. त्या काळी कीत्येक मदांध रावण असंख्य अश्राप सीतांचे राजरोस अपहरण करीत होते. अशा वेळी आपल्या पत्नीचे अपहरण करणा-या रावणाला समूळ उखडून टाकणा-या श्रीरामाचाच आदर्श समाजासाठी योग्य होता. याच हेतूने उत्तर हिंदुस्थानांत गोस्वामी तुलसीदासांनी "राम-चरित-मानस" लिहीले.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. "मराठा तितुका मेळावा" हे शब्द आहेत. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. थोड्याच अवधीत त्यांच्या मठांचे जाळे देश्भर पसरले. शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.
शेके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगुळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपायची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, कांखेस झोळी, अशा थाटांत समर्थांची रूबाबदार आणि दुस-यावर छाप पाडणारी मूर्ति संचार करीत असे. त्यांच्या कुबडीत एक गुप्तीही (छोटी तलवार) असे. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे गुरू अर्जुनदेव यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शील-व्यसनेषु सख्यम' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. गुरू अर्जुनदेवांनीच ती गुप्ती समर्थांना देऊन स्वसंरक्षणार्थ नित्य जवळ बाळगण्यास सुचविले होते.
समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नान-संध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्त्म पारख होती. ते स्वत:उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोक-स्थितीचे उत्तम ज्ञान होत, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.
बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. ते स्वयं-प्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्म-संस्थापना हेच त्यांचे कार्य होते.
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत.
या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

संत एकनाथ


यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक‘पाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी यांना  मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे  नाथांचे जीवन  धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी सद्गुणी, सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. तिचे सासरचे नाव गिरीजा होते. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्र‘यात होता, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.
संत ज्ञानेश्र्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्यूत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रियनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे  रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्र्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते.
एका जनार्दनी सोपा। विठ्ठलनाम मंत्र जपा।।
असा साधा-सरळ संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स.१५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला.

संत नामदेव

‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक!
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्र्चर प्राण होता. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. पंढरीच्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे भूवैकुंठी, पंढरीमध्ये गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरोबांकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
(ह्या प्रसंगाचा उल्लेख तपशीलातील छोट्या-मोठ्या फरकांसह संतविषयक साहित्यात आढळतो.)
संत नामदेवांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वत:ला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे. 
संत ज्ञानेश्र्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्गग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही यांची  मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.

संत ज्ञानेश्वर


‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न!  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर!  गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.
श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.  सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।   एक तरी ओवी अनुभवावी।।’
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!
`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. 

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली  (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -
                  ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
                   वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’

संत तुकाराम


जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
   ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.
    ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.  देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.   
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे  आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.
 
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.

सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते.  पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.
वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,

‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.

‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)

श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.
     जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।

अजित आगरकर




 अजित भालचंद्र आगरकर (डिसेंबर ४, इ.स. १९७७:मुंबई - )हा भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे
पहिल्या काही षटकात हमखास विकेट मिळवून देणा-या  भारतीय  संघात  आलेल्या  ३०  वर्षीय  अजित  आगरकरचा  काही  नेम  नाही  .  स्टार  चांगले  असतील  तर  तो  महत्त्वाच्या  विकेटस्  काढून  देईल  ,  मोक्याच्या  क्षणी  बॅटला  धार  लावून  धावांची  बरसातही  करेल  .  पण  स्टार  खराब  असतील  तर  ...  काही  विचारु  नका  .  आपल्या  तेज  आणि  धारदार  बॉलिंगच्या  जोरावर  वन  डेमध्ये  सर्वात  जलद  ५०  विकेटस्  काढण्याचा  विक्रम  भारतीय  गोलंदाजांमध्ये  आगरकरच्या  नावावर  आहे  .  तसाच  ऑस्ट्रेलियात  लागोपाठ  सात  कसोटी  सामन्यांमध्ये  शून्यावर  आऊट  होण्याचा  पराक्रमही  त्यानेच  गाजवला  आहे  .  २१  बॉलमध्ये  हाफ  सेन्चुरी  झळकावण्याची  आणि  लॉर्डसवर  सेन्चुरी  ठोकण्याची  किमयाही  तोच  करु  शकतो  .  त्यामुळे  असा  खेळाडू  संघात  असणे  ही  जमेची  बाजू  आहे..

ज्योतिबा फुले

परमहंस सभा, प्रार्थना समाज किंवा आर्यसमाज या धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणू पाहणा-या संस्थांपेक्षा महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज वेगळा होता. सत्यशोधक समाजाचे संस्थापक जोतीराव फुले आणि अन्य सभासद हे शूद्र समजल्या जाणा-या जातीत जन्मलेले होते. त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेले अशले तरी बहुतेकजण पदवीधर नव्हते. ख-या अर्थाने तळागाळातल्या माणसांच्या गा-हाण्यांना सत्यशोधकांनी वाचा फोडली. आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने सत्ता गाजवणा-या भटभिक्षुकांवर फुल्यांनी रांगड्या धसमुसळ्या पद्धतीने तिखट शब्दांत घणाघाती हल्ला चढवला. वावदूक शास्त्रीपंडितांनी तसेच कर्मठ सनातन्यांनी महात्मा फुले यांच्या लेखनातल्या व्याकरणाच्या व शुद्धलेखनाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा यशाशक्ती प्रयत्न केला, पण जोतीरावांच्या सा-या लेखनामागचा मानवी हक्कांबद्दलचा व समतेबद्दलचा नवा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही.
सत्यशोधक समाजाची स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षे जोतीरावांनी नानाविध स्वरूपाची लोकसेवा केली होती. मुलींना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढल्या. तसेच विधवाविवाहात विघ्ने आणणा-या कर्मठ सनातन्यांपासून उच्चवर्णीय सुधारकांचे रक्षण केले, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापन केली आणि एका अनाथ मुलाला स्वतःचा मुलगा मानून त्याला लहानाचा मोठा केला. आपल्या घरचा हौद अस्पृश्य समजल्या जाणा-यांना खुला केला. ‘ सत्यदीपिका ’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारख्या ख्रिस्ती मिशनरी आणि ज्ञानोदयासारख्या मिशन-यांच्या मुखपत्राने जोतीरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली. त्यामुळे जोतीराव फुले हे ख्रिस्ती मिशन-यांचे हस्तक, अशी गोपाळराव आगरकरांसारख्या सुधारकाग्रणीचीही समजूत होती. जोतीरावांच्या विचारावर टॉमस पेन यांच्या धर्म व समाजविषयक विचारसरणीचा फार प्रभाव होता.
जोतीरावांनी वैदिक किंवा आर्यांच्या परंपरेवर झोड उठवली. अनार्यांच्या वैदिक परंपरेपासून प्रेरणा घेतली. त्यांनी केवळ जन्माधिष्ठित जातिव्यवस्थाच नाकारली असे नव्हे तर सबंध चातुर्वर्ण्य व्यवस्थाच अन्याय्य व विषम असल्याने त्याज्य ठरवली. जोतीरावांचे एक समकालीन लोकहितवादी यांनीही पुराणातील भकडकथांची चेष्टा केली, पण वेदांविषयी त्यांना आदर होता. याउलट श्रृतिस्मृति, शास्त्रे, पुराणे वगैरे आर्य भटांनी रचलेले भारेच्या भारे ग्रंथ म्हणजे ब्रह्मकपट आहे, असे जोतीराव म्हणत. ‘ त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्तः निशाचराः ’ हे बृहस्पतींचे वचन अनेकदा उद्धृत करीत. सिद्धाचार्य अश्वघोष या लेखकाने रचलेल्या वज्रसूची या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा अनुवाद तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला होता. वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘ एक हिंदू ’ या टोपण नावाने ‘ जातीभेदविवेकसार ‘ ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘ बिप्रमती ’ हा भाग जोतीरावांना आवडत असे. कबीराचा हा ग्रंथ त्यांनी कबीरपंथी ज्ञानगिरीबाबा यांच्याकडून समजावून घेतला होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच हे ग्रंथही जोतीरावांच्या प्रेरणेचे स्रोत होते. सत्यशोधक समाजात सभासदाला प्रवेश देताना तळी उचलावी लागत असे. तळीचे सामान म्हणून एका पिशवीत भंडारा, गुलाल, गुळाचा खडा, खोब-याच्या वाट्या, धने, विड्याची पाने, सुपारी वगैरे जिनसा ठेवलेल्या असत. तळी उचलताना खंडोबा, बहिरोबा वगैरे वीरांच्या नावे चांगभले किंवा येळकोट असा पुकारा केला जात असे. सत्यशोधक समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यापैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे आढळत नाही.
सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या पंचवीस-तीस वर्षांत तेलगू फुलमाळी आणि महाराष्ट्रातील माळी जातीतील सभासदांची संख्या थोडी जास्त असली तरी त्यात मराठा, कुणबी, प्रभू, गवळी, शिंपी, कुंभार, साळी, भंडारी, लिंगायत वाणी, वंजारी वगैरे जातींचेही सभासद होते. कंत्राटदारांखेरीज व्यापारी, सरकारी नोकर, डॉक्टर, वकील, ओव्हरसियर वगैरे व्यावसायिकांचाही समाजाच्या सभासदांमधे आणि मित्रांमधे समावेश होता. १९ व्या शतकातील मुंबईच्या जडणघडणीत पाठारे प्रभू, पाचकळशी किंवा सोमवंशीय क्षत्रिय, सोनार, कपोल भाटिया या जातींप्रमाणेच तेलंगणातून आलेल्या आणि मुंबईत बांधकामाच्या व्यवसायात मजूर, मुकादम, ठेकेदार, कंत्राटदार म्हणून काम करीत नावारुपाला आलेल्या कोमटी, वंजारी तसेच तेलुगू मुनुरवार किंवा तोटा बलीजा (तेलुगू फुलमाळी) या जातीतील लोकांचा मोठा वाटा आहे. मुंबईतील कामाठीपु-यात स्थायिक झालेले हे लोक मराठी भाषा शिकले आणि येथील सांस्कृतिक जीवनाशी एकरू झाले. मुंबईत आजही लक्ष वेधून घेणा-या आणि गेल्या शतकात बांधल्या गेलेल्या कित्येक जुन्या आलीशान इमारतींचे बांधकाम व्यंकू बाळाजी कालेवार, स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू, देवजी यल्लाप्पा, जाया नागू परभाजी, जाया काराडी लिंगू, जयसिंगराव सायबू वडनाला, राजू बाबाजी, नागू सयाजी वगैरे नामवंत कंत्राटदारांनी केले. हे सारे सत्यशोधक समाजाचे सभासद अगर मित्र होते. व्यवसायात कमावलेल्या पैशाचा उपयोग त्यांपैकी काहींनी शाळा काढण्यासाठी, वाचनालये सुरू करण्यासाठी केला. सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी छापखानाही दिला होता. या तेलगू भाषिकांप्रमाणेच फुले, कृष्णाजी पांडुरंग भालेकर (१८५०- १९१०), रामचंद्र हरी शिंदे वगैरे मराठी भाषक माळीही रस्त्यांची, कालव्यांच्या बांधकामाची कंत्राटे घेत असत. इंग्रजी राजवटीमुळे माळ्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून अधिक पैसा मिळवून देणारा कंत्राटदाराचा व्यवसाय करणे त्यांना शक्य झाले. विद्येची बंद कवाडेही त्यांना इंग्रजी राजवटीतच प्रथम खुली झाली. ज्या परकी राजवटीमुळे त्यांना विकासाची संधी प्रथमच मिळाली त्या राजवटीशी ही मंडळी एकनिष्ठ राहाणे स्वाभाविक होते. परक्या राजवटीच्या तुलनेने आधीची स्वकीयांची राजवट त्यांना उपरी व नकोशी वाटली हेही समजण्यासारखे आहे.
सत्यशोधक समाजाची चळवळ ही मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारी चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या नियमांनुसार सभासदांना राजकीय विषयाची चर्चाही करता येत नसे. १८७७ साली समाजाने महारमांगांची दुःखे व दुष्काळ या विषयावर निबंध व वक्तृत्वस्पर्धा घेतल्या तेव्हा चिटणीस या नात्याने जोतीरावांनी स्पर्धकांना जाहीर इशारा दिला होता, ‘ या विषयावर ( म्हणजे राजकारणावर) कोणी उमेदवार लिहील किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलेच बंद केले जाईल ’ . सत्यशोधक समाजालाही इंग्रजी राज्य म्हणजे प्रभूची कृपा वाटत असे, कारण त्यामुले शूद्र आणि अतिशूद्र प्रजा भटशाहीच्या जुलमातून एकदाची सुटली असे फुल्यांचे म्हणणे होते. इंग्रज बहादूराच्या राज्याच्या प्रतापाने भटशाहीत गांजलेल्या सर्व जातीच्या स्त्रियांना तुरळक तुरळक का होईना लिहिता वाचता येऊ लागले याचे फुल्यांना समाधान वाटत होते. न्यायी, उदार, निष्पक्षपाती इंग्रज राजवटीवरील सत्यशोधकांच्या निष्ठेमुले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असल्यामुळे इंग्रजांच्या पलटणीतील सैनिकांना उद्देशून मतप्रचार करण्याची सत्यशोधकांना मुभा दिली जात असे. एवढेच नव्हे तर लष्करातील व पोलिसातील कर्मचारी सत्यशोधक समाजाचे सभासद होऊन कार्य करू लागल्यास इंग्रज सरकारने त्यांना कधी आडकाठी आणली नाही.
शूद्रादी अतिशूद्रांची, सर्व जातीच्या स्त्रियांची, शेतक-यांची दुर्दशा दूर व्हावयाची असेल तर या सर्वांना विद्या मिळविण्याची संधी मिळाली पाहिजे यावर सत्यशोधकांचा भर होता. ‘ विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली। नीतीविना गति गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ‘ असे फुले म्हणत. इंग्रज राज्यकर्त्यांनी विद्यापीठीय स्तरावरील उच्चशिक्षणास अग्रक्रम दिला तर उच्चविद्याविभूषित उच्चवर्णीय आपणास मिळालेले ज्ञान इतरांना देतील आणि अशा त-हेने ज्ञान हळूहळू समाजातील खालच्या थरापर्यंत झिरपत जाईल, असा एक सिद्धांत त्या काळात मांडला जात असे. तो किती पोकळ आहे हे फुल्यांना तीव्रतेने जाणवत होते. संपत्ती व सत्ता यांच्याप्रमाणेच ज्ञानही आपोआप किंवा सहजासहजी खालपर्यंत झिरपत जात नाही. जोतीरावांना याची कल्पना असल्याने त्यांनी ‘ आधी कळस मग पाया रे ’ या विपरित पद्धतीच्या इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल नापसंती दर्शवून प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी केली.
भटभिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्यार्जनाचे महत्त्व वगैरे विचार निरक्षर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग, ओवी, पोवाडा, आरती, मंगलाष्टक, कटाव, लावणी, नाटक, कीर्तन वगैरे बुहसंख्य लोकांना ओळखीच्या असलेल्या वाड्मयप्रकारांचा सत्यशोधकांनी परिणामकारक वापर केला. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे तेव्हा निबंध हा वाड्मयप्रकार मराठीत रुजू लागला होता. ‘ शेतक-यांचा आसूड ’ हा एक विस्तृत निबंध वगळता अशा प्रकारचे लेखन जोतीरावांनी केले नाही. कारण ते ज्यांच्यासाठी लिहित होते त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लफ्फेदार, ऐटबाज व संस्कृतप्रचुर निबंधांपेक्षा मराठमोळे काव्य व संवाद अधिक प्रिय होतील हे त्यांना माहीत होते. खेड्यातील शेतक-यांना फसवणारा व निरक्षऱ पाटलाला मुठीत ठेवणारा कलमबहाद्दर ब्राह्मण कुलकर्णी हे एक सत्यशोधकांच्या मा-याचे महत्त्वाचे लक्ष्य होते. ‘ गावगुंड अडमुठा, लुटीतो कुळकर्णी पठ्ठा ’ या कृष्णाजी पांडुरंग भालेकरांनी लिहिलेल्या लावणीच्या धृपदात किंवा त्यांनीच १८७७ साली लिहिलेल्या बळीबा पाटील नावाच्या ग्रामीण कादंबरीत कुळकर्ण्याविषयीचा शेतक-यांना वाटणारा संताप उफाळून बाहेर येताना दिसतो. सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन, पदरमोड करून भालेकरांनी पुण्यात १८७७ साली ‘ दीनबंधू ’ पत्र सुरू केले तेव्हा त्यांना अवघे १३ वर्गणीदार मिळाले. १८८० च्या मे महिन्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे पत्र चालवावयास घेऊ मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली तेव्हाही फक्त ३२० वर्गणीदार होते. पुरेशा वर्गणीदारांच्या अभावी वृत्तपत्र चालविण्याच्या जिद्दीपायी भालेकरांना घर, जमीन, दागदागिने विकावे लागले. मुंबईसही लोखंडे यांनी भक्कम आर्थिक पाठबळ दिले होते. त्या काळातली बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांसारख्या उच्चवर्णीयांच्या मालकीची असताना सत्यशोधकांनी व त्यांच्या पाठीराख्यांनी दीनमित्रासारखे मासिक ‘ बडोदावत्सल ’ , ‘ राघव भूषण ’ , ‘ अंबालहरी ’ व ‘ शेतक-यांचा कैवारी ’ ही वृत्तपत्रे चालवली होती.
जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असले तरी ते म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार सत्यशोधक चळवळीत आरंभीच्या काळातही नव्हता. वैयक्तिक मतभेदामुळे, स्वभावभिन्नतेमुळे, हेव्यादाव्यांमुळे, नेतृत्वासाठी चालणा-या स्पर्धेमुळे तसेच वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक चळवळीत वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असत. स्त्री पुरुष समतेबद्दलची फुल्यांची मते लोखंडे व भालेकर यांना मान्य नव्हती. ‘ स्त्री पुरुष तुलना ’ नावाचे पुस्तक बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिले तेव्हा लोखंडे व विशेषतः भालेकर यांनी या पुस्तकावर कडाडून टीका केली. त्यावेळी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई या स्त्रियांची कड घेऊ जोतीरावांनी खरमरीत शब्दांत आपल्या अनुयायांची हजेरी घेतली आणि त्यांचे कान उपटले. सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी ‘ इशारा ’ , ‘ सत्सार ’ अंक १ व २ वगैरैंमधून त्यांना धारेवर धरले. रमा, तारेस शिकवायला जाणा-यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे लग्नाच्या भार्येस घरातले घरात आधी विद्वान करावे, असे जोतीरावांनी त्यांना खडसावले. रानड्यांच्या आधी कितीतरी वर्षे जोतीरावांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाईस शिकवून त्यांना शिक्षिका म्हणून आपल्या कामात सहभागी करून घेतले होते.
१८९० साली जोतीराव कालवश झाले. १८९६-९७ ते १९०२ पर्यंतच्या काळात दुष्काळ व प्लेग यांनी थैमान घातले असताना अनेक सत्यशोधक मृत्युमुखी पडले. सावित्रीबाई फुले व नारायणराव लोखंडे यांचे प्लेगने बळी घेतले. व्यंकू बाळोजी कालेवार, जाया काराडी लिंगू, विश्राम रामजी घोले इत्यादि प्रमुख सत्यशोधख १९०२ पूर्वी कालवश झाले. मुंबई आणि पुणे शहरांतील सत्यशोधक समाजाचे काम थंडावल्यासारखे वाटले तरीही ती चळवळ ग्रामीण भागात मूळ धरू लागली. १८९९ सालापासून नारायण बाबाजी पानसरे उर्फ नारो बाबाजी महाधट आणि धर्माजी रामजी डुंबरे पाटील या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या दोघा समाजसेवकांनी चळवळीचे लोण खानदेशात, व-हाड मध्यप्रांतात नेण्यास सुरुवात केली.
 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies