दि ग्रेट मराठा
this site the web

संत ज्ञानेश्वर


‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न!  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर!  गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.
श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.  सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।   एक तरी ओवी अनुभवावी।।’
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!
`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. 

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली  (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -
                  ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
                   वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’

0 comments:

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies