दि ग्रेट मराठा
this site the web

गोकुळ अष्टमी


राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला, आणि भगवदगीता यांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.
या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले.ही कथा सर्वज्ञात आहेच.पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युद्धात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्व जण ह्या दिवशी उपवास करतात.रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात.त्यांस तोडे, साखळ्या असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.
दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही , साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वत:ला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिद्धीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.

0 comments:

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies