दि ग्रेट मराठा
this site the web

समर्थ रामदास



श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (ता. अंबड, जि. औरंगाबाद) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. जांब ही समर्थांची जन्मभूमि, पंचवटी क्षेत्र ही त्यांची तपोभूमि आणि अखिल भारत ही कर्मभूमि होती. गीतेत वर्णिलेला स्थितप्रज्ञ व निष्काम कर्मयोगी यांची चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामी. सन २००८ च्या रामनवमीस त्यांची ४०० वी जयंती होती. या निमित्ताने या महा-पुरूषाचे आणि त्याच्या कार्याचे विनम्र-भावे स्मरण करावे, एवढाच या छोट्याशा लेखाचा उद्देश आहे.
भरतांत संत पुष्कळ होउन गले. पण राष्ट्र-गुरू हे बिरूद ज्यांना शोभेल असे संत दुर्मिळच आहेत. श्रीमद आद्य शंकराचार्य हे एक राष्ट्र-गुरू होते. अलीकडील काळांत विवेकानंद हे राष्ट्र-गुरू होउन गेले. राष्ट्र-गुरू हा समाजांतील कोणत्या तरी एकद्या छोट्याशा गटाच्या नव्हे, तर सा-या राष्ट्राच्या उध्दारासाठी झटत असतो. त्याचप्रमाणे राष्ट्राचा केवळ पारमार्थिक उध्दारच नव्हे, तर ऐहिक उध्दारही साधण्याची त्याची महत्वाकांक्षा असते. समर्थ रामदास हेही एक महान राष्ट्र-गुरू होउन गेले. छ्त्रपति शिवाजीमहाराजांसारख्या पुण्यश्लोक पुरूषाने त्यांना गुरु मानले होते. हे पाहिले म्हणजे त्यांच्या योग्यतेविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता उरत नाही.
समर्थांच नाव नारायण. सूर्याजिपंत ठोसर हे त्यांचे वडील, आणि राणूबाई या त्यांच्या मातोश्री. नारायण सात वर्षाचा असतांनाच सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण हा मुलगा लहानपणापासूनक विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुध्दिमान आणि निश्चयी होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने याचे लग्न ठरविण्यात आले. त्यावेळी याचे वय होते १२ वर्षाचे. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. पाण्यांत किडे, मासे, इत्यादि चावत असत. १२ वर्षाच्या तीव्र तपसश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्र केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.
आत्म साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.
रोग्यास एकाएकी शक्तिवर्धक आहार दिल्यास तो न पचल्यामुळे फायद्याऐवजी त्याचे नुकसानच होण्याचा संभव असतो. म्हणून शक्तिवर्धक आहार देण्यापुर्वी कुशल वैध रोग्यास प्रथम बनवितो. परमार्थ हाही दुर्बलाचा प्रांत नव्हे. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
त्या काळी समाज-स्थिति कशी होती. हे या कथेवरून चंगले दिसून येते. ही कथा एकनाथांच्या सहनशीलतेची आहे खरी, पण त्याहीपेक्षा अधिक ती समाजाच्या नामर्दपणाची कथा आहे. एका संताच्या अंगावर अनेकदां थुंकणा-या त्या मुजोर अविंधाला जाब विचारणारा समाजांत कोणी निघाला नाही! अन्यायाचा प्रतिकार केला पाहीजे, हे कोणीच सांगत नव्ह्ते. सारे नाथांच्या सहनशीलतेचे गुणगान करून स्वत:ची नामर्दता झांकीत होते.
स्वदेशाच्या शोचनीय स्थितीने अंत:करण तिळतिळ तुटणारे आणि समाजाची स्थिती सुधारण्याची तळमळ असणारे संत तेव्हां नव्हते, असे नाही. पण नुसत्या तळमळीने काय होते? प्रत्यक्ष कृतीशिवाय नुसती तळमळ व्यर्थच नव्हे काय? प्रत्यक्ष कृति केवळ समर्थांनी केली आहे. इतर संत प्रपंच सोडून केवळ निवृति सांगत होते. तर समर्थांनी निवृति व प्रवृति यांचा समन्वय सांगितला. समर्थांनी परमार्थ सोडला नाही. पण त्यासाठी प्रत्यक्ष व्यवहाराकडे त्यांनी डोळेझांक केली नाही. स्वत:चा एकट्याचा प्रपंच सोडून त्यांनी सारया समाजाचा प्रपंच सांभाळ्ला. समर्थ संत होते, पण व्यवहारीही होते. संन्यासी होते, पण राजकारणीही होते. आणि भक्तिमार्गीही होते. पण केवळ टाळ्कुटे नव्ह्ते! समर्थांचे वेगळेपण यावरून दिसून येते.
"यतोSभुदय-नि:श्रेयस-सिध्दि: स धर्म:" या व्याख्येस अनुसरून एहिक अभ्युदय आणि पारमार्थिक नि:श्रेयस हे दोन्ही साधणे हे धर्माचे स्वरूप त्यांनी प्रतिपादिले. हाच "महाराष्ट्र-धर्म" होय. शारीरिक शक्तिसाठी मारूति व नैतिक शक्तिसाठी राम यांच्या उपासनेची त्यांनी योजना केली. त्या काळी कीत्येक मदांध रावण असंख्य अश्राप सीतांचे राजरोस अपहरण करीत होते. अशा वेळी आपल्या पत्नीचे अपहरण करणा-या रावणाला समूळ उखडून टाकणा-या श्रीरामाचाच आदर्श समाजासाठी योग्य होता. याच हेतूने उत्तर हिंदुस्थानांत गोस्वामी तुलसीदासांनी "राम-चरित-मानस" लिहीले.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. "मराठा तितुका मेळावा" हे शब्द आहेत. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. थोड्याच अवधीत त्यांच्या मठांचे जाळे देश्भर पसरले. शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.
शेके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगुळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपायची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, कांखेस झोळी, अशा थाटांत समर्थांची रूबाबदार आणि दुस-यावर छाप पाडणारी मूर्ति संचार करीत असे. त्यांच्या कुबडीत एक गुप्तीही (छोटी तलवार) असे. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे गुरू अर्जुनदेव यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शील-व्यसनेषु सख्यम' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. गुरू अर्जुनदेवांनीच ती गुप्ती समर्थांना देऊन स्वसंरक्षणार्थ नित्य जवळ बाळगण्यास सुचविले होते.
समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नान-संध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्त्म पारख होती. ते स्वत:उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोक-स्थितीचे उत्तम ज्ञान होत, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.
बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. ते स्वयं-प्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्म-संस्थापना हेच त्यांचे कार्य होते.
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत.
या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

0 comments:

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies