दि ग्रेट मराठा
this site the web

ज्योतिबा फुले

परमहंस सभा, प्रार्थना समाज किंवा आर्यसमाज या धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणू पाहणा-या संस्थांपेक्षा महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज वेगळा होता. सत्यशोधक समाजाचे संस्थापक जोतीराव फुले आणि अन्य सभासद हे शूद्र समजल्या जाणा-या जातीत जन्मलेले होते. त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेले अशले तरी बहुतेकजण पदवीधर नव्हते. ख-या अर्थाने तळागाळातल्या माणसांच्या गा-हाण्यांना सत्यशोधकांनी वाचा फोडली. आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने सत्ता गाजवणा-या भटभिक्षुकांवर फुल्यांनी रांगड्या धसमुसळ्या पद्धतीने तिखट शब्दांत घणाघाती हल्ला चढवला. वावदूक शास्त्रीपंडितांनी तसेच कर्मठ सनातन्यांनी महात्मा फुले यांच्या लेखनातल्या व्याकरणाच्या व शुद्धलेखनाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा यशाशक्ती प्रयत्न केला, पण जोतीरावांच्या सा-या लेखनामागचा मानवी हक्कांबद्दलचा व समतेबद्दलचा नवा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही.
सत्यशोधक समाजाची स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षे जोतीरावांनी नानाविध स्वरूपाची लोकसेवा केली होती. मुलींना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढल्या. तसेच विधवाविवाहात विघ्ने आणणा-या कर्मठ सनातन्यांपासून उच्चवर्णीय सुधारकांचे रक्षण केले, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापन केली आणि एका अनाथ मुलाला स्वतःचा मुलगा मानून त्याला लहानाचा मोठा केला. आपल्या घरचा हौद अस्पृश्य समजल्या जाणा-यांना खुला केला. ‘ सत्यदीपिका ’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारख्या ख्रिस्ती मिशनरी आणि ज्ञानोदयासारख्या मिशन-यांच्या मुखपत्राने जोतीरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली. त्यामुळे जोतीराव फुले हे ख्रिस्ती मिशन-यांचे हस्तक, अशी गोपाळराव आगरकरांसारख्या सुधारकाग्रणीचीही समजूत होती. जोतीरावांच्या विचारावर टॉमस पेन यांच्या धर्म व समाजविषयक विचारसरणीचा फार प्रभाव होता.
जोतीरावांनी वैदिक किंवा आर्यांच्या परंपरेवर झोड उठवली. अनार्यांच्या वैदिक परंपरेपासून प्रेरणा घेतली. त्यांनी केवळ जन्माधिष्ठित जातिव्यवस्थाच नाकारली असे नव्हे तर सबंध चातुर्वर्ण्य व्यवस्थाच अन्याय्य व विषम असल्याने त्याज्य ठरवली. जोतीरावांचे एक समकालीन लोकहितवादी यांनीही पुराणातील भकडकथांची चेष्टा केली, पण वेदांविषयी त्यांना आदर होता. याउलट श्रृतिस्मृति, शास्त्रे, पुराणे वगैरे आर्य भटांनी रचलेले भारेच्या भारे ग्रंथ म्हणजे ब्रह्मकपट आहे, असे जोतीराव म्हणत. ‘ त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्तः निशाचराः ’ हे बृहस्पतींचे वचन अनेकदा उद्धृत करीत. सिद्धाचार्य अश्वघोष या लेखकाने रचलेल्या वज्रसूची या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा अनुवाद तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला होता. वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘ एक हिंदू ’ या टोपण नावाने ‘ जातीभेदविवेकसार ‘ ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘ बिप्रमती ’ हा भाग जोतीरावांना आवडत असे. कबीराचा हा ग्रंथ त्यांनी कबीरपंथी ज्ञानगिरीबाबा यांच्याकडून समजावून घेतला होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच हे ग्रंथही जोतीरावांच्या प्रेरणेचे स्रोत होते. सत्यशोधक समाजात सभासदाला प्रवेश देताना तळी उचलावी लागत असे. तळीचे सामान म्हणून एका पिशवीत भंडारा, गुलाल, गुळाचा खडा, खोब-याच्या वाट्या, धने, विड्याची पाने, सुपारी वगैरे जिनसा ठेवलेल्या असत. तळी उचलताना खंडोबा, बहिरोबा वगैरे वीरांच्या नावे चांगभले किंवा येळकोट असा पुकारा केला जात असे. सत्यशोधक समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यापैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे आढळत नाही.
सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या पंचवीस-तीस वर्षांत तेलगू फुलमाळी आणि महाराष्ट्रातील माळी जातीतील सभासदांची संख्या थोडी जास्त असली तरी त्यात मराठा, कुणबी, प्रभू, गवळी, शिंपी, कुंभार, साळी, भंडारी, लिंगायत वाणी, वंजारी वगैरे जातींचेही सभासद होते. कंत्राटदारांखेरीज व्यापारी, सरकारी नोकर, डॉक्टर, वकील, ओव्हरसियर वगैरे व्यावसायिकांचाही समाजाच्या सभासदांमधे आणि मित्रांमधे समावेश होता. १९ व्या शतकातील मुंबईच्या जडणघडणीत पाठारे प्रभू, पाचकळशी किंवा सोमवंशीय क्षत्रिय, सोनार, कपोल भाटिया या जातींप्रमाणेच तेलंगणातून आलेल्या आणि मुंबईत बांधकामाच्या व्यवसायात मजूर, मुकादम, ठेकेदार, कंत्राटदार म्हणून काम करीत नावारुपाला आलेल्या कोमटी, वंजारी तसेच तेलुगू मुनुरवार किंवा तोटा बलीजा (तेलुगू फुलमाळी) या जातीतील लोकांचा मोठा वाटा आहे. मुंबईतील कामाठीपु-यात स्थायिक झालेले हे लोक मराठी भाषा शिकले आणि येथील सांस्कृतिक जीवनाशी एकरू झाले. मुंबईत आजही लक्ष वेधून घेणा-या आणि गेल्या शतकात बांधल्या गेलेल्या कित्येक जुन्या आलीशान इमारतींचे बांधकाम व्यंकू बाळाजी कालेवार, स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू, देवजी यल्लाप्पा, जाया नागू परभाजी, जाया काराडी लिंगू, जयसिंगराव सायबू वडनाला, राजू बाबाजी, नागू सयाजी वगैरे नामवंत कंत्राटदारांनी केले. हे सारे सत्यशोधक समाजाचे सभासद अगर मित्र होते. व्यवसायात कमावलेल्या पैशाचा उपयोग त्यांपैकी काहींनी शाळा काढण्यासाठी, वाचनालये सुरू करण्यासाठी केला. सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी छापखानाही दिला होता. या तेलगू भाषिकांप्रमाणेच फुले, कृष्णाजी पांडुरंग भालेकर (१८५०- १९१०), रामचंद्र हरी शिंदे वगैरे मराठी भाषक माळीही रस्त्यांची, कालव्यांच्या बांधकामाची कंत्राटे घेत असत. इंग्रजी राजवटीमुळे माळ्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून अधिक पैसा मिळवून देणारा कंत्राटदाराचा व्यवसाय करणे त्यांना शक्य झाले. विद्येची बंद कवाडेही त्यांना इंग्रजी राजवटीतच प्रथम खुली झाली. ज्या परकी राजवटीमुळे त्यांना विकासाची संधी प्रथमच मिळाली त्या राजवटीशी ही मंडळी एकनिष्ठ राहाणे स्वाभाविक होते. परक्या राजवटीच्या तुलनेने आधीची स्वकीयांची राजवट त्यांना उपरी व नकोशी वाटली हेही समजण्यासारखे आहे.
सत्यशोधक समाजाची चळवळ ही मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारी चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या नियमांनुसार सभासदांना राजकीय विषयाची चर्चाही करता येत नसे. १८७७ साली समाजाने महारमांगांची दुःखे व दुष्काळ या विषयावर निबंध व वक्तृत्वस्पर्धा घेतल्या तेव्हा चिटणीस या नात्याने जोतीरावांनी स्पर्धकांना जाहीर इशारा दिला होता, ‘ या विषयावर ( म्हणजे राजकारणावर) कोणी उमेदवार लिहील किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलेच बंद केले जाईल ’ . सत्यशोधक समाजालाही इंग्रजी राज्य म्हणजे प्रभूची कृपा वाटत असे, कारण त्यामुले शूद्र आणि अतिशूद्र प्रजा भटशाहीच्या जुलमातून एकदाची सुटली असे फुल्यांचे म्हणणे होते. इंग्रज बहादूराच्या राज्याच्या प्रतापाने भटशाहीत गांजलेल्या सर्व जातीच्या स्त्रियांना तुरळक तुरळक का होईना लिहिता वाचता येऊ लागले याचे फुल्यांना समाधान वाटत होते. न्यायी, उदार, निष्पक्षपाती इंग्रज राजवटीवरील सत्यशोधकांच्या निष्ठेमुले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असल्यामुळे इंग्रजांच्या पलटणीतील सैनिकांना उद्देशून मतप्रचार करण्याची सत्यशोधकांना मुभा दिली जात असे. एवढेच नव्हे तर लष्करातील व पोलिसातील कर्मचारी सत्यशोधक समाजाचे सभासद होऊन कार्य करू लागल्यास इंग्रज सरकारने त्यांना कधी आडकाठी आणली नाही.
शूद्रादी अतिशूद्रांची, सर्व जातीच्या स्त्रियांची, शेतक-यांची दुर्दशा दूर व्हावयाची असेल तर या सर्वांना विद्या मिळविण्याची संधी मिळाली पाहिजे यावर सत्यशोधकांचा भर होता. ‘ विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली। नीतीविना गति गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ‘ असे फुले म्हणत. इंग्रज राज्यकर्त्यांनी विद्यापीठीय स्तरावरील उच्चशिक्षणास अग्रक्रम दिला तर उच्चविद्याविभूषित उच्चवर्णीय आपणास मिळालेले ज्ञान इतरांना देतील आणि अशा त-हेने ज्ञान हळूहळू समाजातील खालच्या थरापर्यंत झिरपत जाईल, असा एक सिद्धांत त्या काळात मांडला जात असे. तो किती पोकळ आहे हे फुल्यांना तीव्रतेने जाणवत होते. संपत्ती व सत्ता यांच्याप्रमाणेच ज्ञानही आपोआप किंवा सहजासहजी खालपर्यंत झिरपत जात नाही. जोतीरावांना याची कल्पना असल्याने त्यांनी ‘ आधी कळस मग पाया रे ’ या विपरित पद्धतीच्या इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल नापसंती दर्शवून प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी केली.
भटभिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्यार्जनाचे महत्त्व वगैरे विचार निरक्षर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग, ओवी, पोवाडा, आरती, मंगलाष्टक, कटाव, लावणी, नाटक, कीर्तन वगैरे बुहसंख्य लोकांना ओळखीच्या असलेल्या वाड्मयप्रकारांचा सत्यशोधकांनी परिणामकारक वापर केला. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे तेव्हा निबंध हा वाड्मयप्रकार मराठीत रुजू लागला होता. ‘ शेतक-यांचा आसूड ’ हा एक विस्तृत निबंध वगळता अशा प्रकारचे लेखन जोतीरावांनी केले नाही. कारण ते ज्यांच्यासाठी लिहित होते त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लफ्फेदार, ऐटबाज व संस्कृतप्रचुर निबंधांपेक्षा मराठमोळे काव्य व संवाद अधिक प्रिय होतील हे त्यांना माहीत होते. खेड्यातील शेतक-यांना फसवणारा व निरक्षऱ पाटलाला मुठीत ठेवणारा कलमबहाद्दर ब्राह्मण कुलकर्णी हे एक सत्यशोधकांच्या मा-याचे महत्त्वाचे लक्ष्य होते. ‘ गावगुंड अडमुठा, लुटीतो कुळकर्णी पठ्ठा ’ या कृष्णाजी पांडुरंग भालेकरांनी लिहिलेल्या लावणीच्या धृपदात किंवा त्यांनीच १८७७ साली लिहिलेल्या बळीबा पाटील नावाच्या ग्रामीण कादंबरीत कुळकर्ण्याविषयीचा शेतक-यांना वाटणारा संताप उफाळून बाहेर येताना दिसतो. सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन, पदरमोड करून भालेकरांनी पुण्यात १८७७ साली ‘ दीनबंधू ’ पत्र सुरू केले तेव्हा त्यांना अवघे १३ वर्गणीदार मिळाले. १८८० च्या मे महिन्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे पत्र चालवावयास घेऊ मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली तेव्हाही फक्त ३२० वर्गणीदार होते. पुरेशा वर्गणीदारांच्या अभावी वृत्तपत्र चालविण्याच्या जिद्दीपायी भालेकरांना घर, जमीन, दागदागिने विकावे लागले. मुंबईसही लोखंडे यांनी भक्कम आर्थिक पाठबळ दिले होते. त्या काळातली बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांसारख्या उच्चवर्णीयांच्या मालकीची असताना सत्यशोधकांनी व त्यांच्या पाठीराख्यांनी दीनमित्रासारखे मासिक ‘ बडोदावत्सल ’ , ‘ राघव भूषण ’ , ‘ अंबालहरी ’ व ‘ शेतक-यांचा कैवारी ’ ही वृत्तपत्रे चालवली होती.
जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असले तरी ते म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार सत्यशोधक चळवळीत आरंभीच्या काळातही नव्हता. वैयक्तिक मतभेदामुळे, स्वभावभिन्नतेमुळे, हेव्यादाव्यांमुळे, नेतृत्वासाठी चालणा-या स्पर्धेमुळे तसेच वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक चळवळीत वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असत. स्त्री पुरुष समतेबद्दलची फुल्यांची मते लोखंडे व भालेकर यांना मान्य नव्हती. ‘ स्त्री पुरुष तुलना ’ नावाचे पुस्तक बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिले तेव्हा लोखंडे व विशेषतः भालेकर यांनी या पुस्तकावर कडाडून टीका केली. त्यावेळी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई या स्त्रियांची कड घेऊ जोतीरावांनी खरमरीत शब्दांत आपल्या अनुयायांची हजेरी घेतली आणि त्यांचे कान उपटले. सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी ‘ इशारा ’ , ‘ सत्सार ’ अंक १ व २ वगैरैंमधून त्यांना धारेवर धरले. रमा, तारेस शिकवायला जाणा-यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे लग्नाच्या भार्येस घरातले घरात आधी विद्वान करावे, असे जोतीरावांनी त्यांना खडसावले. रानड्यांच्या आधी कितीतरी वर्षे जोतीरावांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाईस शिकवून त्यांना शिक्षिका म्हणून आपल्या कामात सहभागी करून घेतले होते.
१८९० साली जोतीराव कालवश झाले. १८९६-९७ ते १९०२ पर्यंतच्या काळात दुष्काळ व प्लेग यांनी थैमान घातले असताना अनेक सत्यशोधक मृत्युमुखी पडले. सावित्रीबाई फुले व नारायणराव लोखंडे यांचे प्लेगने बळी घेतले. व्यंकू बाळोजी कालेवार, जाया काराडी लिंगू, विश्राम रामजी घोले इत्यादि प्रमुख सत्यशोधख १९०२ पूर्वी कालवश झाले. मुंबई आणि पुणे शहरांतील सत्यशोधक समाजाचे काम थंडावल्यासारखे वाटले तरीही ती चळवळ ग्रामीण भागात मूळ धरू लागली. १८९९ सालापासून नारायण बाबाजी पानसरे उर्फ नारो बाबाजी महाधट आणि धर्माजी रामजी डुंबरे पाटील या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या दोघा समाजसेवकांनी चळवळीचे लोण खानदेशात, व-हाड मध्यप्रांतात नेण्यास सुरुवात केली.

0 comments:

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies